नवी दिल्ली: राजस्थानमधील जयपूर जवळच्या सूजातमध्ये राहणारे तेजाराम संखला तिथल्या स्थानिकांना मोलमजुरी करुन जीवन जगणारा 50 वर्षीय व्यक्ती म्हणून परिचयाचे आहेत. पण वास्तविक, त्यांच्या मुलाचे कर्तृत्व इतके मोठे आहे की, ते ऐकून कोणालाही अश्चर्याचा धक्का बसेल. कारण त्यांचा 26 वर्षीय मुलगा रामचंद्र इंटरनेट ब्राऊजर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गूगलमध्ये एक्झिक्यूटीव्ह पदावर कार्यरत आहे.


मुलाने यशाचे उत्त्युच्च शिखर गाठले असले, तरी त्याचे 50 वर्षीय वडील तेजाराम ट्रकमध्ये बॉक्स चढवणे आणि उतरवण्याचे काम करतात. जर एखादा दिवस चांगला असेल, तर तेजाराम यांना 400 रुपयांची मजूरी मिळते. पण त्यांचा मुलगा रामचंद्र वर्षाला 36 लाख इतका पगार घेतो. 2013 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झालेला रामचंद्रने तीनच वर्षात कामातील सातत्याने आज अमेरिकेत वास्तव्याला आहे.

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र सांगतो की, ''त्याच्या वडिलांनी अशाप्रकारे मोलमजुरी करावे हे आपल्याला मान्य नाही. पण त्यांनाही घरात मोकळे बसणे अमान्य असल्याने ते स्वस्थ बसत नाहीत.''

रामचंद्र सांगतो की, ''सूजातमध्ये त्याने एका हिंदी माध्यमिक शाळेतून 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतले. 2009 मध्ये आयआयटी रुडकीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एज्यूकेशन लोनसाठी बँकेकडे अर्ज केला. पण ते मंजूर न झाल्याने पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरचे शिक्षण वडिलांना कर्ज घेऊन पूर्ण करावे लागले. पण त्यानंतर एज्यूकेशन लोन मंजूर झाल्याने रामचंद्रला पुढील शिक्षण घेणे सोपे झाले. पण इंजिनिअरच्या शिक्षणासाठी लॅपटॉप किंवा कम्प्यूटरची गरज असल्याने, त्याच्या समाज बांधवांनी त्याला 30 हजार रुपये गोळा करुन दिले. यातून त्याने एक लॅपटॉप खरेदी केला.

अतिशय खडतर परिश्रम करुन आयआयटीमध्ये प्रवेश मिळवलेल्या रामचंद्रने आपला भाऊ आणि बहिणीलाही शिकवण्यासाठी 2015 मध्ये एका अनाथश्रमातील मुलांना शिकवले. यातून मिळालेल्या शिष्यवृत्तीमधून त्याने आपल्या भाऊ-बहिणीचा शिक्षणाचा खर्च भागवला. मात्र, रामचंद्रप्रमाणे त्याच्या भाऊ-बहिणीला चमकदार कामगिरी करणे शक्य झाले नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला त्याचा 24 वर्षीय भाऊ पुण्यामध्ये चप्पल विक्रीचा व्यवसाय करतो. तर त्याच्या बहीण B.Sc मध्ये अनुत्तीर्ण झाल्याने, तिने शिक्षण तिथेच थांबवले.

आर्थिक परिस्थितीत ठिक झाल्यानंतर अमेरिकेतून परतून समाजसेवा करण्याचा मानस असल्याचे रामचंद्र यांने या मुलाखती दरम्यान सांगितले.