नवी दिल्ली : काळा पैसा रोखल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारला स्विस नॅशनल बँकेकडून (एसएनबी) जारी करण्यात आलेल्या अहवालाने मोठा हादरा बसला आहे. या अहवालानुसार, स्विस बँकेत भारतीयांचा पैसा 50 टक्क्यांनी वाढून हा आकडा सात हजार कोटींवर पोहोचला आहे.


भारतीयांकडून स्विस बँकेच्या खात्यांमध्ये थेट ठेवलेला पैसा वाढून 99.9 कोटी स्विस फ्रँक आणि दुसऱ्यांच्या माध्यमातून जमा केलेली रक्कमही वाढून 1.6 कोटी स्विस फ्रँक एवढी झाली आहे. या आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये परदेशी नागरिकांची एकूण रक्कम 1460 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 100 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.



काळा पैसा रोखण्यासाठी मोदी सरकारकडून विशेष मोहिम राबवण्यात आलेली असतानाही ही आकडेवारी धक्कादायक आहे. स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये ग्राहकांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते, ज्यामुळे या बँकेत नागरिक गुंतवणूक करतात.

स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात 2016 साली 45 टक्क्यांनी कपात झाली होती. सर्वाधिक कपात झाल्यानतंर हा वार्षिक आकडा 4500 कोटी रुपये होता. 1987 साली युरोपियन बँकांनी डेटा जारी करण्यास सुरुवात केल्यानंतरची भारताची ही सर्वात मोठी कपात होती.

एसएनबीच्या आकडेवारीनुसार, भारतीयांकडून स्विस बँकांमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने ठेवलेली रक्कम 2017 मध्ये वाढून 6891 कोटी रुपये झाली. तर फंड मॅनेजर्सच्या माध्यमातून ठेवली जाणारी रक्कम 112 कोटी रुपये आहे.

या आकडेवारीनुसार, स्विस बँकेमध्ये जमा भारतीयांच्या रकमेत 3200 कोटी रुपये ग्राहक ठेव, 1050 कोटी रुपये दुसऱ्या बँकांच्या माध्यमातून आणि 2640 कोटी रुपये इतर रुपाने गुंतवण्यात आले आहेत.