कबीरनगर (उ.प्र.): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत योगी आदित्यनाथ संत कबीरनगरधील कबीर समाधीवर टोपी घालण्यास नकार देताना दिसत आहेत. योगींनी टोपी हातात घेण्यासही नकार दिल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी (बुधवारी) कबीर समाधी परिसराची पाहणी करण्यासाठी कबीरनगरमध्ये आले होते. कबीर समाधी स्थानी पोहचताच तेथे उपस्थित खादीम यांनी योगींना लोकरी टोपी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी योगींनी टोपी घालण्यास नकार दिला. टोपी घालण्यास नकार दिल्यानंतर मौलवींनी त्यांना टोपी घेण्याची विनंती केली. मात्र टोपी स्वीकारण्यासही योगी यांनी नकार दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

योगींनी पारंपारिक टोपीला हात लावला आणि टोपी परत केली. मात्र योगींनी नकार दिलेल्या टोपीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या व्हिडीओवरुन काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


संत कबीर दास यांच्या 620व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील मगहर जिल्ह्यातील कबीर यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. समाधीस्थळावरील मजारवर मोदींनी चादरही चढवली. यावेळी मोदींनी कबीर अॅकॅडमीची पायाभरणी देखील केली.