पाकिस्तानात कट, ‘लष्कर-ए-तोयबा’कडून शुजात बुखारींची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2018 06:46 PM (IST)
पोलिसांनी या चारही दहशतवाद्यांचे फोटो सार्वजनिक केले आहेत. हल्ल्यात सहभागी दहशतवादी हे ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आहेत.
श्रीनगर : जेष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’नेच घडवून आणली, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. चार दहशतवाद्यांनी शुजात बुखारींच्या हत्या केली, ज्यातील एक दहशतवादी पाकिस्तानचा रहिवाशी आहे. सज्जाद गुल, आजाद अहमद मलिक, मुजफर अहमद भट आणि नवीद जट या दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस आयजी एसपी पानी यांनी दिली. “ही दहशतवादी घटना आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो,” असं एसपी पानी म्हणाले. पोलिसांनी या चारही दहशतवाद्यांचे फोटो सार्वजनिक केले आहेत. हल्ल्यात सहभागी दहशतवादी हे ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात हत्येचा कट रचला होता. 14 जूनला बुखारींची हत्या 'राजझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी हे 14 जूनला संध्याकाळी इफ्तारसाठी आपल्या घरी चालले होते. त्याचवेळी 'रायझिंग काश्मीर'च्या कार्यालयाबाहेरच बुखारींची हत्या केली गेली. यावेळी त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांचीही हत्या केली गेली. रमजानमध्ये संध्याकाळी रस्त्यावर फारशी गर्दी नसते. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी याच वेळेची निवड केली. दरम्यान, मध्यममार्गी भूमिकेसह संतुलित लिखाणासाठी पत्रकार शुजात बुखारी ओळखले जात. सीसीटीव्ही फुटेजही समोर 'रायझिंग काश्मीर'च्या कार्यालयाबाहेर घडलेल्या या खळबळजनक हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी सार्वजनिक केलं होतं. ज्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बुखारींच्या गाडीवर गोळीबार केल्याचं दिसत होतं. त्यातील एकाने हेल्मेट तर अन्य दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता.