मुंबई : मायानगरी... बीएसई टू बॉलिवूड आणि इंडस्ट्री टू इंटरनॅशल ट्रेड सगळं काही मुंबई... पण याच मराठमोळ्या मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरु केलाय का? असा प्रश्न आहे. कारण अहमदाबाद टू मुंबई बुलेट ट्रेनसोबतच मोदींनी महाराष्ट्रातील उद्योगांना पर्याय म्हणून गिफ्ट सिटीची उभारणी सुरु केली आहे.
एकेकाळी मुंबई आणि गुजरात दोन्ही मिळून एकच राज्य होतं. पण 1 मे 1960 ला भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र वेगळा झाला. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं. त्यानंतर उद्योग, शेती, सिंचन, मनोरंजन सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला. पण आता लहान भाऊ असलेला गुजरात महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे.
बुलेट ट्रेन आणि गिफ्ट सिटी ही महाराष्ट्राविरोधातली दोन महत्वाची आयुधं आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 7 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन असेल. तिथून अवघ्या तासाभरात टेक्स्टाईल आणि डायमंड हब असलेल्या सूरतला पोहोचता येईल. तर अवघ्या 2 तासावर अहमदाबादच्या फाईव्ह स्टार गिफ्ट सिटीत पोहोचता येईल.
देशातल्या हिरे बाजाराची उलाढाल 1 लाख कोटींच्या घरात आहे. हिऱ्याच्या घडणावळीचं काम सूरत, अहमदाबादेत होतं. तर इंपोर्ट-एक्स्पोर्टचं काम मुंबईतून केलं जातं. झवेरी बाजार त्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आता एवढ्यासाठी मुंबईसारख्या महागड्या शहरात आणि गर्दीत राहण्याची गरज उरणार नाही. कारण मोदींनी अशा सगळ्या उद्योग, व्यापाऱ्यांसाठी साबरमतीच्या काठावर आणि अहमदाबाद-गांधीनगरच्या मध्ये गिफ्ट सिटी बांधायला घेतली आहे.
काय आहे गिफ्ट सिटी?
तब्बल 880 एकरावर ‘गिफ्ट’ अर्थात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी उभी राहिल. फायनान्स, बँकिंग, ट्रेडिंग, मार्केटिंग, बीपीओ, आयटी, हॉटेल अशा सगळ्या सेक्टर्ससाठी इथं हक्काची जागा असेल. 2020 पर्यंत इथं 30 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.
विकासदरात गिफ्ट सिटी 5 टक्क्यांची भर घालेल, तर वर्षाला 1 लाख 25 हजार कोटीची उलाढाल करेल, असाही दावा करण्यात आला आहे.
मोदींच्या गुजरातची शान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील इंटरनॅशनल फायनान्स सर्विस सेंटरचा बळी गेला आहे. जो बीकेसीत उभा राहणार होता. पण मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी बीकेसीतील 0.9 हेक्टर जागा द्यावी लागली, आणि फडणवीसांना काहीही करता आलं नाही.
भारताच्या अर्थव्यवस्थेत मुंबई 6 टक्क्यांचा भार उचलते. देशाच्या एकूण टॅक्सपैकी 30 टक्के पैसा मुंबईतून मिळतो आणि त्याचं कारण मुंबईचं औद्योगिक महत्त्व. आता हेच महत्त्व बुलेट ट्रेनच्या वेगाने गुजरातच्या गिफ्ट सिटीत जाऊन विसावण्याची भीती आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या उलाढालीवर आणि रोजगारावर होऊ शकतो.
बुलेट ट्रेन ते गिफ्ट सिटी... मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2017 04:43 PM (IST)
अहमदाबाद टू मुंबई बुलेट ट्रेनसोबतच मोदींनी महाराष्ट्रातील उद्योगांना पर्याय म्हणून गिफ्ट सिटीची उभारणी सुरु केली आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या औद्योगिक महत्त्वावर होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -