नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंगळवारी त्यांनी 50 देशांच्या राजदूत आणि राजकीय व्यक्तींची भेट घेतली. त्यानंतर पत्रकांराशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मोहन भागवत यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिराचा प्रश्न निकाली निघेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, भागवत म्हणाले की, "सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. सुप्रीम कोर्टाचा यावर जोकाही निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असेल."

संघ आणि भाजपच्या संबंधांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की, "संघ भाजपला नियंत्रित करत नाही. किंवा भाजप संघाला नियंत्रित करतो असंही नाही. आम्ही स्वतंत्र राहून एका स्वयंसेवकाप्रमाणे त्यांच्याशी संपर्कात असतो. आणि त्यामाध्यमातूनच दोघांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होते."

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोहन भागवत यांनी आपले पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध असल्याचं सांगितलं. अनेक विषयांवर पंतप्रधानांशी त्यांची नेहमी चर्चा होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, एका थिंकटँकच्या वतीनं आयोजित परिषदेत बोलताना, मोहन भागवात यांनी संघ इंटरनेटवरील ट्रोलिंगचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच कसल्याही प्रकारचा भेदाभेद न बाळगता संघ देशाच्या अखंडत्वासाठी काम करत असल्याचं सांगितलं होतं.