शाळेत ‘येस सर’ ऐवजी ‘जय हिंद’ बोला!, मध्य प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांच्या अजब फतवा
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2017 02:22 PM (IST)
मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विजय शाह यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना हजेरीवेळी 'येस सर' किंवा 'येस मॅडम' ऐवजी 'जय हिंद' बोलणे बंधनकारक असणार असल्याचं सांगितलं आहे.
फोटो सौजन्य : एएनआय
भोपाळ : शाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी घेताना नेहमी विद्यार्थी 'येस सर' किंवा 'येस मॅडम' म्हणतात. पण मध्य प्रदेशच्या शिक्षण मंत्री विजय शाह यांनी अजब फतवा लागू करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण आता शाळेत हजेरीवेळी विद्यार्थ्यांना 'येस सर' नव्हे, तर 'जय हिंद' बोलणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिक्षण मंत्री विजय शाह म्हणाले की, "आता शाळेतील विद्यार्थ्यांना हजेरीवेळी 'येस सर' किंवा 'येस मॅडम' ऐवजी 'जय हिंद' बोलणे बंधनकारक असणार आहे. सरकारी शाळांसोबतच खासगी शाळांमधूनही हा नियम बंधनकारक असून, याची अंमलबजावणी 1 ऑक्टोंबरपासून करण्यात येणार आहे.'' दोन दिवसांच्या चित्रकूट दौऱ्यावरुन सटणामध्ये दाखल झाल्यानंतर, पत्रकारांशी बोलाताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. असे करण्यामागे विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी हे करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या निर्णयाची सटण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर, संपूर्ण राज्यात हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.