Mission Rail Karmayogi : आपण बाहेर जाण्याची योजना बनवतो, याची सुरुवात होते ती रेल्वे तिकीट बुक करण्यापासून..एखाद्यावेळी तिकीट बुक करण्यासाठी आपण रेल्वे स्थानकात गेलो, पण तो आरक्षण फॉर्म कसा भरायचा तेच माहित नसेल तर? किंवा आपण ट्रेनची वाट पाहत आहोत, आणि ट्रेन नेमकी कुठे येणार माहित नसेल तर? अशावेळी आपली बरीच फजिती होते आणि यात बराच वेळ देखील जातो. पण, आता या सगळ्या समस्यांवर लगेचच मदत मिळणार आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा असणारा ‘रेल कर्मयोगी’ (Mission Rail Karmayogi) यात प्रवाशांना मदत करणार आहे.


प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे एक असा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी उभा करणार आहे, जो रेल्वेशी संबंधित समस्या सोडवेल. तसेच, प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल?, आपल्याला हवा असलेला डबा कुठे असेल? आदींची सारी माहिती देईल. भारतीय रेल्वे मंत्रालय मोठ्या स्थानकांवर प्रवाशांच्या मदतीसाठी ‘रेल्वे कर्मयोगी’ (Rail Karmyogi) तैनात करणार आहे.


रेल्वेची नवी मोहीम!


बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. अशाच एका उपक्रमात आता मिशन रेल कर्मयोगी प्रशिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. आतापर्यंत अशा 50 हजारांहून अधिक कर्मयोगींना प्रशिक्षित करून तैनात करण्यात आले आहे. खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.



मिशन कर्मयोगी हा रेल्वे प्रवासी किंवा रेल्वे ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. याअंतर्गत देशभरात किमान एक लाख ‘रेल कर्मयोगी’ तयार केले जात आहेत. हे कर्मयोगी रेल्वे प्रवासी किंवा रेल्वेशी व्यावसायिक संबंध असलेल्या लोकांचा अनुभव आणखी सुधारतील. लखनौस्थित इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला (IRITM) रेल्वे कर्मयोगी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.


रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, IRITM येथे 28 फेब्रुवारी 2022 रोजी मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण सुरू झाले. IRITM च्या प्रत्येक बॅचमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील सात विभागातील मास्टर ट्रेनर आहेत. ANI नुसार, आतापर्यंत 49 विभागांचा समावेश असलेल्या मास्टर ट्रेनर्सचा 8 बॅचमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि 8वी बॅच सध्या IRITM मध्ये प्रशिक्षण घेत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: