Tajinder Bagga Arrested : भाजप प्रवक्ता तेजिंदर बग्गा यांना अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पंजाबमधील मोहाली येथे बग्गा यांच्याविरोधात सायबर गुन्हे विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बग्गा हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांच्या ट्वीटवरून वादही निर्माण होतात. तेजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. 


तेजिंदर बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केले होते. बग्गा यांच्या ट्वीटमुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा आरोप करत मोहालीत  गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तेजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पंजाब पोलिसांचे 50 जवान दाखल झाले होते, असा दावा कपिल मिश्रा यांनी केला. बग्गा अशा कारवाईमुळे घाबरणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


तर, दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी सांगितले की, आम आदमी पक्षाकडून पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. पंजाबमधील सत्तेचा वापर आता विरोधकांना धमकावण्यासाठी सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही तेजिंदर बग्गा यांच्या पाठिशी असल्याचे कपूर यांनी म्हटले. 


तेजिंदर बग्गा यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे नेते डॉक्टर सनी सिंह यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बग्गा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंजाब पोलीस याआधी देखील दिल्लीत दाखल झाली होती. मात्र, पंजाब पोलिसांना माघारी फिरावे लागले होते.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या मुद्यावरून टिप्पणी केली होती. त्यानंतर बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. तेजिंदर बग्गा यांनी याआधीदेखील अनेकदा वादग्रस्त ट्वीट केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.