नागरिकत्व सुधारीत कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणीवरुन सुरुवातीला ईशान्य भारत पेटला. ही आग राजधानी दिल्लीत पोहचली. दिल्लीतील जामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचारामुळे ही आग आता उत्तर भारतासह देशभर पोहचत आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरुन या कायद्याचा विरोध करत आहेत. यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अफवा, चुकीच्या माहितीमुळे ही आंदोलने आणखी चिघळली जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळेच सध्याच्या वातावरणात 'चुकीची माहिती' हे सुरक्षा दलांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केलं आहे. सोबतच माध्यमांची देखील यामध्ये महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर भारतात तीव्रता जास्त -
सीएएच्या विरोधात काल गुरुवारी लखौनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तर, आज मेरठमध्ये आंदोलकांनी पोलिस ठाणे पेटवल्याचीही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात लखौनसह अनेक जिल्ह्यांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यानंतरही अनेक जिल्ह्यांत आज पुन्हा हिंसक आंदोलने झाली. यात पाच जण ठार झाले आहेत. फिरोझाबादसह गोरखपूर, मेरठ, गाझियाबाद, हापुड, बहराइच, बलरामपूर, मुझफ्फरनगर, बिजनौर, गोरखपूर, कानपूर, उन्नाव, भदोही तसेच गोंडा येथे हिंसक निदर्शने झाली.
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलने -
विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले. औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन मुस्लीम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला. तिकडे नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियाँ मशिदीबाहेर जवळपास एक तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजानं मोर्चा निघाला. याशिवाय पुण्यातही मुस्लिम समाजाकडून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. एकीकडे शांततेत आंदोलन सुरु असताना दुसरीकडे बीड आणि जालन्यात मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको, राज्यातील सर्वधर्मियांच्या हक्कांचं संरक्षण करणार : मुख्यमंत्री
Citizenship Act | नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नाही : अभाविप | सोलापूर | ABP Majha