नवी दिल्ली :  देशात अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट, सर्व्हेक्षण आणि दक्षता यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. या मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान लागू असणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे.


याव्यतिरिक्त, इतर विविध कामांसाठीही नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त आवश्यक कामांना परवानगी देण्यात येईल असे गृह मंत्रालयाने सांगितले. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हा, पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची असणार आहे. याव्यतिरिक्त, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संबंधित अधिकाऱ्यांसोबत जबाबदारी निश्चित करतील.