नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन झालं. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल यांची ओळख होती. ते 71 वर्षांचे होते. साधारणतः महिन्याभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा फैजल अहमद यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. अहमद पटेल यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


एक ईमानदार सहकारी, मित्र गमावला : सोनिया गांधी


काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अहमद पटेल यांच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, त्यांनी एक ईमानदार सहकारी, मित्र गमावला आहे. एक असा सहकारी गमावला आहे, ज्याने संपूर्ण जीवन पक्षासाठी दिलं. तसेच सोनिया गांधी सध्या प्रकृती अस्वास्थामुळे गोव्यात आहेत. अशातच मानलं जात आहे की, सोनिया गांधी अहमद पटेल यांच्या अंतिम दर्शनासाठी जाऊ शकणार नाहीत.





अहमद पटेल म्हणजे, पक्षाचे आधारस्तंभ : राहुल गांधी


काँग्रेस खासदरा राहुल गांधी यांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांनी एक ट्वीट केलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, 'हा एक दुखद दिवस आहे. अहमद पटेल काँग्रेस पक्षाचे एक आधारस्तंभ होते. त्यांनी काँग्रेससाठी आपलं उभं आयुष्य दिली. तसेच पक्षाच्या कठिण काळातही पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ते पक्षाची एक खास संपत्ती होती. ते आमच्या कायम स्मरणात राहतील. फैजल, मुमताज आणि कुटुंबियांना माझं प्रेम आणि संवेदना.'





अहमदजींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली : प्रियांका गांधी


प्रियांका गांधी यांनी ट्वीट केलं असून त्या म्हणाल्या की, 'अहमदजी एक बुद्धिमान आणि अनुभवी सहकारी होते. त्यांचा सल्ला घेण्यासाठी आणि एखाद्या विषयी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मी त्यांना नेहमी भेटत असे. ते एक असे मित्र होते, जे आम्हा सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. निष्ठावान आणि शेवटपर्यंत विश्वासार्ह्य होते. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'





काँग्रेस पक्षाला मजबूत बनवण्यासाठी अहमद पटेल यांची महत्त्वाची भूमिका : पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'अहमद पटेल यांच्या निधनाने दुखी आहे. त्यांनी आपल्या जीवनातील अनेक वर्ष सार्वजनिक जीवनासाठी दिली. समाजाची सेवा केली. ते आपल्या कुशल बुद्धिसाठी ओळखले जाणारे अहमद पटेल यांची काँग्रेस पक्षाला मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका नेहमीच आठवणीत राहिल. त्यांचा मुलगा फैजल याच्याशी आमचं बोलणं झालं. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो.'





एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेला : दिग्विजय सिंह


अहमद पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केलं आहे की, "अहमद पटेल आपल्यातून निघून गेले. एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेलाय. आम्ही दोघंही 1977 पासून एकत्र होतो. ते लोकसभेत पोहोचले. मी विधानसभेत. आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक राजकीय आजाराचं औषध होते. मृदुभाषी, व्यवहार कुशल आणि सदैव हसतमुख राहणं हिच त्यांची ओळख होती.


अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जातात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री म्हणतात. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.





काँग्रेससाठी अहमद पटेल यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील : शरद पवार 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. शरद पवार म्हणाले की, 'भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. अहमद पटेल यांचे अकाली निधन दुःखदायक आहे. काँग्रेससाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!'


अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले : बाळासाहेब थोरात


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन; वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास