पाटणा : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  केंद्रीय कायदा आणि विधि मंत्री रविशंकर प्रसाद हे पाटण्यात होणाऱ्या या अंत्यसंस्कारावेळी केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पासवान यांचं पार्थिव आज दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पाटण्यातील निवासस्थान कृष्णा पुरी वरुन जनार्दन घाट (दीघा) इथं आणलं जाईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गुरुवारी सायंकाळी त्यांचं निधन झालं होतं.


रामविलास पासवान यांचं पार्थिव शरीर शुक्रवारी रात्री पाटण्याला नेण्यात आलं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. पाटण्यात  विधानसभा आणि पार्टी ऑफिसमध्ये पासवान यांना श्रद्धांजली अर्पित केली गेली.  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासब राज्यातील अनेक नेत्यांनी पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रामविलास पासवान यांची राजकीय कारकिर्द

रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष होते. बिहारमधून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पासवान यांनी बी.ए. आणि त्यानंतर एल.एल.बी.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पोलीस सेवेत नोकरी मिळाल्यानंतर ती न स्वीकारता त्यांनी राजकीय मार्ग स्वीकारला. विश्वनाथ प्रताप सिंह, एचडी देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली.

पहिल्यांदा ते 1969 मध्ये ते बिहार विधानसभेवर निवडून आले. राम विलास पासवान यांनी 32 वर्षात 11 निवडणुका लढल्या आणि त्यापैकी 9 जिंकल्या. देशाच्या सहा पतप्रधानांसोबत काम करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. 1989 मध्ये ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर एच. डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. गुजराल सरकारमध्ये त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा कारभार पाहिला.

रामविलास पासवान आठ वेळा लोकसभा सदस्य आणि विद्यमान राज्यसभेचे खासदार होते. संयुक्त समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 1969 मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये हाजीपूर मतदारसंघातील जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर ते 1980, 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये खासदार राहिले. त्यानंतर 2000 साली त्यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली. त्यानंतर 2004 मध्ये ते सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सामील झाले आणि रसायन व खते मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री राहिले.