भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपशासित राज्य सरकारने पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. या पाच जणांमध्ये भय्यू महाराज यांचा समावेश आहे.


सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त सचिव के के काटिया यांच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. यामध्ये भय्यू महाराजांसोबत नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे.

नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी पाच आध्यात्मिक गुरुंची समिती 31 मार्चला नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य म्हणून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेशात विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. या पाच गुरुंना समाजात असलेला आदर लक्षात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने हे पाऊल उचलल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

पर्यावरण आणि नदी संवर्धन सोपं करण्यासाठी संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्याचं उत्तर भाजप प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी दिलं आहे. लोकसहभाग वाढावा यासाठी या संतांचं कार्य उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपला वाटतो.