मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळावा आणि मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर भाजपने शक्तीप्रदर्शनासाठी कंबर कसली आहे. स्थापना दिनाचं औचित्य साधून येत्या 6 एप्रिल रोजी भाजपचा महामेळावा मुंबईत दणक्यात साजरा केला जाणार आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विशेष उपस्थितीत पक्षाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.


शिवसेनेने दसरा मेळाव्यात 'एकला चलो रे'चा नारा दिला, तर मनसेनं पाडव्याला 'मोदीमुक्त भारता'चं आवाहन केलं. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपने सुद्धा कंबर कसली आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच स्थापना दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी 6 एप्रिलला सुमारे 4 लाख कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल होणार असल्याचा भाजपचा दावा आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष घातलं आहे.

भाजपने महामेळाव्यासाठी कशी तयारी केली आहे?

राज्यात 80 हजार बूथ प्रमुख, 19 विंग, 7 आघाड्यांचे पदाधिकारी, 5 हजार सरपंच, 12 जिल्हा परिषदा, 13 महापालिका आणि 72 नगरपालिकांचे लोकप्रतिनिधी महामेळाव्याला येणार. तसेच आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यावर प्रत्येकी 5 ते 10 कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासाठी महाराष्ट्रासोबत, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडूतून येणार 28 स्पेशल ट्रेन्स बुक केल्या जातील. याखेरीज राज्यभरातून 300 बसेस आणि जिप्स आणल्या जातील.

या सभेसाठी बीकेसी मैदनाता 3 स्टेज, 7 पंडाल, 5 पार्किंग लॉट, 2 राहण्यासाठी टेंट उभारण्यात आले आहेत.

कार्यकर्त्यांसाठी प्रवास सुरु झाल्यापासून ते पुन्हा घरी पोहचेपर्यंत फूड पॅकेट्स आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

2014 ला सत्तेत आल्यानंतर महापालिका निवडणुकांपासून ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत भाजपने जिंकण्याचा रतीबच लावला. या चढत्या आलेखामुळे सत्तेची नशा डोक्यात गेल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते आणि पदाधिकऱ्यांमध्ये नव्याने जोश भरण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या निमित्ताने होताना दिसतो आहे.

या जल्लोष सभेनंतर अमित शाह हे स्वत: मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स ऑडिट करणार आहेत. कार्यकर्त्यांना ऊर्जा दिल्यानंतर नेत्यांची झाडाझडती होणार आहे. मात्र प्रत्येक निवडणूक जिंकण्याचं तंत्र अवगत केलेल्या अमित शाह यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचा कानोसा घेण्यात यश मिळतं का हे येणारा काळच ठरवेल.