नवी दिल्ली : दुरावलेले मित्रपक्ष सांभाळण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. संसदेचं वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने शिवसेनेला तशी ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे.

कुरियन यांचा कार्यकाळ संपला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रोफेसर पी जे कुरियन यांचा राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपल्याने लवकरच नव्या उपसभापतींची निवड होणार आहे. हे पद कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना देण्यासाठी भाजप तयार नाही. हे पद मित्रपक्षांपैकीच कोणालातरी मिळावं, यासाठी भाजपचा प्रयत्न आहे.

अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंचा!
त्यामुळे भाजपने उपसभापतीपसाठी शिवसेनेला ऑफर दिली आहे. शिवाय या पदाबाबत भाजपची शिवसेनेसोबत चर्चा झाल्याचीही खात्रीलायक माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच याबाबत अंतिम निर्णय घेतील.

सीनियर संजय राऊतांना उपसभापतीपद?
राज्यसभेत सध्या शिवसेनेचे तीन खासदार आहेत. संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत हे खासदार राज्यसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यांच्यामध्ये संजय राऊस सीनियर असल्याने त्यांना उपसभापतीपद देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा आहे.

त्यामुळे शिवसेना हे पद स्वीकारणार का याची उत्सुकता आहे.

राज्यसभेचं गणित
राज्यसभेत एकूण 250 खासदार असतात. पण सध्या राज्यसभेत 245 सदर्य आहेत. त्यापैकी 12 खासदार राष्ट्रपती नियुक्ती असतात. तर इतर सदस्यांची नेमणूक निवडणुकीने होते. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यामधील एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी सेवानिवृत्त होतात.