नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी कामांना उशीर करणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. गडकरी यांनी नवी दिल्लीतील एका व्हर्चुअल कार्यक्रमात  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) मधील सुस्त कामावरुन अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.  द्वारका येथील NHAI च्या नव्या इमारतीचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केल्यानंतर  गडकरी म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी कामाला उशीर केला आहे, त्यांचे फोटो 12 वर्षांपर्यंत त्या इमारतीत लावायला हवीत.


सुस्त कामामुळं 9 वर्षांनंतर पूर्ण झाला प्रोजेक्ट- गडकरी

यावेळी गडकरी म्हणाले की, एनएचएआय सुधारणा होण्याची अत्यंत गरज आहे. आता त्या नॉन परफॉर्मिंग एसेट्स (काम न करणारे अधिकारी) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. ते गोष्टींना किचकट बनवतात आणि अडचणी निर्माण करतात, असं गडकरी म्हणाले. ते म्हणाले की,  50 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट 2008 मध्ये तयार केला होता. याचं टेंडर 2011 मध्ये निघालं आणि आता नऊ वर्षांनी हे काम पूर्ण झालं.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, एनएचआयमधील अकर्मण्य, कामचुकार आणि भ्रष्ट लोक इतके पावरफुल आहेत की मंत्रालयानं सांगितल्यानंतर देखील ते आपले निर्णय चुकीचे घेतात. अशा ‘अक्षम' अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. गडकरी म्हणाले की, इमानदार अधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे, अन्यथा ते निर्णय घेऊ शकणार नाहीत.

वेळेवर पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांमुळं भारत आत्मनिर्भर होईल- गडकरी

नितीन गडकरी म्हणाले की, वेळेवर पूर्ण होणाऱ्या गुणवत्तापूर्ण चांगल्या प्रकल्पांमुळंच आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य प्राप्त होऊ शकेल. तसेच ते म्हणाले की,   पर्यावरण मंजूरी मिळणे मोठी समस्या आहे.