नवी दिल्ली : जगभरात ट्विटरची सेवा काही वेळासाठी ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून, ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या. मात्र, डाऊन झालेलं ट्विटर तासानंतर पूर्ववत सुरू झालं. यापूर्वी देखील ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
ट्विटरचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ट्विटर जगभरात काम करेनासे झाले होते. ट्विटर सुमारे सव्वा तास ठप्प होते. बुधवारी सायंकाळी 7.40 वाजता ट्विटरवर ट्वीट करण्यास अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मलेशिया, इंडोनेशियासह आशिया खंडातील अनेक देशांना याचा फटका बसला. रात्री 8.55 वाजता ट्विटर पुन्हा सुरू झाले.
ट्विटरची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ट्विटर डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे ट्विटर अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत होते. भारतात ट्विटर युजची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर ट्विटर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम होत असतो. ट्विटर ठप्प होण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी देखील ट्विटर डाऊन झाले होते. 16 ऑक्टोबरला देखील ट्विटर डाऊन झाले होते.
पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, अॅमेझॉन सीईओ जेफ बेजोस, वॉरेन बफेट, बिल गेट्स, एलॉन मस्क, जो बिडेनसह अनेक लोकांचे अकाउंट्स हॅकर्सनी हॅक केले होते. ट्विटरची सुरुवात 21 मार्च 2006 ला झाली आहे.