बंगळुरु : फोटोत आलिशान कारसोबत उभी असलेली व्यक्ती व्यवसायाने एक सलूनवाला आहे. कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही, पण गिऱ्हाईकांच्या डोक्यावर सराईतपणे फिरणारे हे हात कोट्यधीश आहेत. हेअर ड्रेसर असलेल्या रमेशबाबू यांच्या ताफ्यात नुकतीच आलिशान मर्सिडीज मेबॅक दाखल झाली असून तिची किंमत तब्बल 3 कोटी 20 लाख आहे.


एक सर्वसामान्य सलूनवाला इतक्या महागड्या गाडीचा मालक कसा झाला, याची कहाणी रंजक आहे. रमेशबाबू यांच्या लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. आई आणि भावंडांसहित मोठ्या कष्टात त्यांचं बालपण गेलं. दहावीनंतर त्यांनी शिक्षण सोडलं आणि आपला वडिलोपार्जित केशकर्तनाचा व्यवसाय सुरु केला.

1994 मध्ये त्यांनी एक ओम्नी कार खरेदी केली आणि तिथून त्यांचं नशीब पालटलं. ओम्नी कारच्या कर्जाचे हप्ते थकल्याने रमेश बाबू यांनी ती कार भाड्याने देण्यास सुरुवात केली. तिथेच त्यांना गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करण्याची आयडिया सुचली.

त्यावेळी सर्रास सगळ्यांकडेच गाड्या नव्हत्या. त्यामुळे कार भाड्याने घेण्याकडे लोकांचा कल अधिक होता. रमेश यांचा व्यवसाय वाढीस लागला. एकामागोमाग एक गाड्या वाढत गेल्या आणि मग रमेश बाबू यांनी एक मोठा डाव खेळला.

सेलिब्रेटींसाठी लागणाऱ्या गाड्या पुरवण्याची सेवा रमेश बाबू यांनी सुरु केली. बंगळुरुमधल्या हॉटेल्सना गाड्या पुरवण्यासाठी त्यांनी आपल्या ताफ्यात बीएमडब्ल्यूसह मर्सिडीजचा समावेश केला. त्यात 11 मर्सिडीज, 3 ऑडी, 3 रोल्स रॉईल आणि 2 जॅग्वारही सामील आहेत.

रमेश बाबू यांचा व्यवसाय इतका वाढला, की त्यांच्या ताफ्यात आजमितीला तब्बल 150 आलिशान गाड्या, 25 सुपरवायझर्स आणि 130 ड्रायव्हर्स काम करतात. इतकंच नाही तर ऐश्वर्या रायपासून बराक ओबामांच्या स्वागतासाठी फक्त आणि फक्त रमेश बाबू यांच्याच कार वापरल्या जाऊ लागल्या.

लग्नाच्या वरातींमध्येही रमेश बाबू यांच्या आलिशान कार्सना मागणी वाढू लागली. रमेशबाबू यांचा बिझनेस फंडा एकच होता, ज्याला अशा आलिशान कार घेणं शक्य नाही. त्याला आपण किमान या कारमध्ये बसण्याचा आनंद देणं आणि त्या आनंदाच्या मोबदल्यात पैसे कमवणं.

रमेशबाबू यांचा बिझनेस मंत्रही खास आहे. दृढनिश्चय आणि कष्ट हेच तुमच्या आयुष्याचे कंगवा आणि कात्री आहेत. त्याने आपण आपल्या आयुष्याची स्टायलिंग करु शकतो. रमेश बाबूंचा हा मंत्र कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.