नागपूर : एकीकडे नागपुरात ईव्हीएम विरोधात मोर्चा सुरु असताना भाजपने चक्क काँग्रेस नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्यासह पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ईव्हीएमबद्दल धादांत खोटे आरोप केल्याबद्दल बजावण्यात आल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला महाराष्ट्रात जोरदार यश मिळालं मात्र ईव्हीएम मशीनमध्ये भाजपने घोळ केला, धनशक्ती वापरुन निवडणूक जिंकली असे आरोप झाले. सर्व पक्ष भाजपविरोधात एकत्र आल्यामुळे सूर तीव्र झाले.
भाजपच्या विधी सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तिवारी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या आदिवासी भागात राहणाऱ्या आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांच्या वतीने नोटीस पाठवल्या आहेत.
अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष आणि स्टार प्रचारक म्हणून तर नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्व नेत्यांनी भाजपची आणि जिंकून आलेल्या उमेदवारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.