मुंबई: अतिरिक्त बँक व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार असल्यामुळे, खातेदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.


मात्र सर्वसामन्य खातेदार ज्यांच्याजवळ ATM कार्ड आहे, त्यांना घाबरण्याचं कारण नाही. कारण बँकांनी अतिरिक्त बँक व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याचं म्हटलं आहे.  म्हणजेच बँक शाखेत जाऊन केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारलं जाईल. पण त्यांनी कुठेही ATM व्यवहार/ट्रान्झॅक्शनचा उल्लेख केलेला नाही.

यापूर्वी ATM वर जे जुने दर/मर्यादा आहेत, ते कायम असतील, मात्र 1 मार्चपासून नव्याने कोणतीही घोषणा झालेली नाही.

कोणत्या व्यवहारांवर शुल्क आकारणार?

कॅशलेस व्यवहारांना अधिकाधिक चालना देण्यासाठी खासगी बँकांनी बँक व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 4 पेक्षा जास्त वेळा होणाऱ्या बँक व्यवहारांवर (बँकेत जाऊन केलेल्या व्यवहारांवर) प्रत्येकी 150 रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. 1 मार्चपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

हा नियम 1 मार्चपासून सेव्हिंग आणि सॅलरी अकाउंटवर लागू करण्यात आला आहे.

HDFC बँक

HDFC बँकेने जारी केलेल्या पत्रकानुसार,

  • महिन्यातून 4 वेळ बँक शाखेत जाऊन पैसे काढल्यास कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र त्यानंतर प्रत्येक व्यवहाराला 150 रुपये शुल्क लागेल.

  • तुमच्या होम ब्रँचमध्ये महिन्याला 2 लाखांपर्यंतच्या व्यवहारांवर काही शुल्क नसेल. मात्र त्यापुढे जर पैसे भरले किंवा काढल्यास हजाराला 5 रुपये या दराने शुल्क आकारलं जाईल.

  • तुमच्या होम ब्रँच व्यतिरिक्त अन्य शाखेत व्यवहार केल्यास, रोजचे 25 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार निशुल्क असतील. मात्र त्यापुढील व्यवहाराला 5 रुपये प्रतिहजार रुपये अशा दराने शुल्क आकारले जाईल.

  • साध्या बचत खात्यात तुम्ही कितीही वेळा बँकेत पैसे भरु शकता, त्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीत.


Axis बँक

  • अॅक्सिस बँकेत खातं असणाऱ्यांसाठी महिन्याला 5 ट्रान्झॅक्शन फ्री असतील

  • पण सहाव्यांदा जर तुम्ही व्यवहार करायला गेलात तर 95 रुपये शुल्क लागेल.

  • पुढील प्रत्येक व्यवहारासाठी किमान 95 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

  • अॅक्सिस बँकेच्या होम ब्रँचव्यतिरिक्त अन्य शाखेतील पहिले 5 व्यवहार निशुल्क असतील. मात्र त्याची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत असेल.

  • या 5 निशुल्क व्यवहारानंतर तुम्हाला त्यापुढील प्रत्येक व्यवहारासाठी हजार रुपयाला अडीच रुपये किंवा 95 रुपये यापैकी जी जास्त रक्कम असेल त्यानुसार शुल्क आकारलं जाईल.


ICICI बँक

  • आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांसाठी पहिली चार ट्रान्झॅक्शन मोफत असतील, त्यानंतर प्रत्येक हजार रुपयाच्या व्यवहाराला 5 रुपये शुल्क लागेल.

  • थर्ड पार्टी व्यवहारांसाठी दिवसाला 50 हजार रुपयांची मर्यादा असेल.

  • होम ब्रँच व्यतिरिक्त अन्य शाखेतून महिन्यातून एकदाच कितीही पैसे विनाशुल्क काढू शकता. मात्र त्यानंतरच्या व्यवहारांसाठी तुम्हाला प्रत्येक हजार रुपयाला 5 रुपये किंवा 150 रुपये यातील जे जास्त शुल्क असेल ते आकारलं जाईल.

  • याशिवाय तुम्ही जर बँकेत जाऊन पैसे भरणार असाल, तर हजाराला 5 रुपये याप्रमाणे शुल्क आकारलं जाईल.

  • जर तुम्ही बँकेच्या डिपॉझिट मशिनमध्ये पैसे भरले, तर पहिल्या व्यवहारासाठी कोणतंही शुल्क नसेल. मात्र त्यानंतरच्या व्यवहाराला हजाराला 5 रुपये याप्रमाणे शुल्क आकारलं जाईल.


कॅशलेस व्यवहार ही कल्पना म्हणून उत्तम आहे. यामुळे उत्पन्न लपवणं, करचुकवेगिरी करणं थांबेल. मात्र गावखेड्यात, पाड्यांवर कॅशलेस व्यवहारांची सोय सरकारनं केली आहे का? नोटाबंदीनंतरची लाचखोरी नव्या नोटांमध्येही कशी चालू आहे? बिल्डरांचे ब्लॅकचे व्यवहार बंद झाले का? याची उत्तरं मिळत नाहीत इतकंच. त्यामुळे निव्वळ सामान्यांचं नाक दाबून काय होणार हा सवाल आहे.

संबंधित बातम्या:

चारपेक्षा जास्त बँक व्यवहारावर 150 रु. अतिरिक्त शुल्क!

HDFC चा दणका, ATM मधून पाचव्यांदा पैसे काढताना 150 रुपये फी