नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच देशभरातील परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. तर त्या खालोखाल जम्मू-काश्मीरचा क्रमांक आहे. या यादीनुसार महाराष्ट्रात एकूण 84 हजार 50 जणांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे.


गृह मंत्रालयाने 31 डिसेंबर 2016 पर्यंतची शस्त्र बाळगण्यासाठी परवानाधारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार देशभरातील 33 लाख 69 हजार 444 जणांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आल्याचे याद्वारे सांगण्यात येत आहे.

यातील उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 12 लाख 77 हजार 914 जणांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. तर वारंवार दहशतवाद हल्ले आणि हिंसाचारांचा बळ ठरणार्या जम्मू-काश्मीरमध्ये 3 लाख 69 हजार 191 जणांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे.

1980 आणि 90 च्या दशकापासून दहशतवादी हल्ल्यांना बळी पडलेल्या पंजाबमधील 3 लाख 59 हजार 349 व्यक्तींना शस्त्रं बाळगण्याचा परवाना देण्यात आला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशमधील 2 लाख 47 हजार 130 आणि हरियाणामधील 1 लाख 41 हजार 926 जणांना कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे.

इतर राज्यांमध्ये राजस्थान 1 लाख 33 हजार 968, कर्नाटकमधील 1 लाख 13 हजार 631, महाराष्ट्र 84 हजार 50, बिहार 82 हजार 585, हिमाचल प्रदेश 77 हजार 69, उत्तराखंड 64 हजार 770, गुजरात 60 हजार 784 आणि पश्चिम बंगालमधील 60 हजार 525 जणांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे.

तर राजधानी दिल्लीत 38, 754 नागालँडमध्ये 36060, अरुणाचल प्रदेश 34394, मणिपूर 26, 836, तामिळनाडू 22,532 आणि ओडिशामधील 20 हजार 588 जणांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे.

गृह मंत्रालयाच्या मते केंद्र शासित प्रदेशांमधील दमण-दीव तसेच दादरा-नागर हवेलीमध्ये सर्वात कमी शस्त्र परवाने दिले आहेत. या दोन्ही प्रदेशांमधील प्रत्येकी 125 जणांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे.