बंगळुरु : ‘मोदी माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते आहेत’ अशा शब्दात सिंघम फेम जयकांत शिकरे म्हणजेच प्रकाश राजनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे.


बंगळुरुमधल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रकाश राज यांनी ही टीका केली. बंगळुरु येथे झालेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या बैठकीत ते बोलत होते.

‘मोदी अभिनय करत नाही असं त्यांना वाटत असेल. मात्र, अभिनय काय आणि सत्य काय हे मी चांगलं ओळखतो.’ अशा शब्दात प्रकाश राज यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

मोदींनी गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत आजही मौन बाळगलं आहे. त्यामुळे मी उद्विग्न झालो आहे. असं प्रकाश राज म्हणाले.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर निखिल दधीच या व्यक्तीनं गौरी लंकेश यांच्याबाबत फारच वादग्रस्त अशी पोस्ट लिहली होती. या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आजही सोशल मीडियावर फॉलो करतात. यावरुन मोदींवर बरीच टीकाही झाली होती. याचबाबत बोलताना प्रकाश राज यांनी मोदींबाबत हे वक्तव्य केलं आहे.

याप्रकरणी प्रकाश राज आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करणार असल्याचं वृत्त सुरुवातीला समोर आलं होतं. पण आपण कोणतेही पुरस्कार परत करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'हे पाचही पुरस्कार माझ्या मेहनतीचे आहेत त्यामुळे ते मी परत करणार नाही.' असं स्पष्टीकरण प्रकाश राज यांनी दिलं आहे.



कोण आहेत प्रकाश राज?

प्रकाश राज हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अशी त्यांची ओळख आहे. प्रकाश राज यांनी सलमान खानसोबत वाँटेड आणि दबंग-2, अजय देवगणसोबत सिंघम , संजय दत्तसोबत पोलिसगिरी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत खाकी यासारखे अनेक बड्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

संबंधित बातम्या : 

सिंघमचा व्हिलन दिलदार, प्रकाश राज यांच्याकडून गाव दत्तक