नवी दिल्ली : परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. #MeToo मोहीमेअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर एमजे अकबर पायउतार झाले. एमजे अकबर यांच्याविरुद्ध 19 महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.


"न्यायदेवतेच्या मंदिरात राहून न्याय मागायचा ठरवल्याने मी या पदावरुन पायउतार होत आहे. जेणेकरुन माझ्याविरुद्ध लागलेल्या खोट्या आरोपांना आव्हान देणं योग्य ठरेल," असं एमजे अकबर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.



97 वकिलांची फौज
लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अकबर यांनी 97 वकिलांची फौज उभी केली आहे. प्रिया रमानी यांच्याविरोधात अकबर यांनी सोमवारी (15 ऑक्टोबर) पटियाला हाऊस कोर्टात वैयक्तिक अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

प्रिया रमानींनी जाणीवपूर्वक आणि चुकीच्या भावनेने आरोप केले आहेत, असा आरोप करत एमजे अकबर यांनी करनजावाला अँड कंपनी या लॉ फर्मच्या माध्यमातून पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणारी याचिका दाखल केली आहे.

अब्रुनुकसानीचा दावा ठोकणाऱ्या एम. जे. अकबर यांच्याबाबत बोलताना, प्रिया रमानी म्हणाल्या, "मी प्रचंड निराश आहे, कारण महिलांकडून झालेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री राजकीय कट असल्याचं म्हणत फेटाळत आहे. माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करुन अकबर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय."

काय आहे प्रकरण?
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोण आहेत प्रिया रमानी?
प्रिया रमानी या मोठ्या कालावधीपासून माध्यमांमध्ये काम करत आहेत. इंडिया टुडे, इंडियन एक्स्प्रेस इत्यादींसोबत त्यांनी काम केले असून, रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेतही त्यांनी काम केले आहे. कॉस्मोपॉलिटन या आंतरराष्ट्रीय फॅशन मॅगझिनच्या प्रिया रमानी या संपादिकाही राहिल्या आहेत. 'मिंट'च्या फीचर संपादकही त्या होत्या. तसेच, प्रकाशन व्यावसायातील प्रसिद्ध अशा 'जगरनॉट'चं संपादकपदही त्यांनी भूषवलंय.