गाझियाबाद : अवघ्या एका रुपयाच्या वसुलीसाठी बँकेने चक्क 84 रुपयाचं नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेने वसुलीसाठी ग्राहकाला नोटीस पाठवली होती. ही नोटीस पाठवण्यासाठीच बँकेचे 85 रुपये खर्च झाले. कुरिअरद्वारे ही नोटीस पाठवली होती.
आयडीबीआय बँकेतील हे प्रकरण आहे. बँकेने गाझियाबादमधील एका ग्राहकला एक रुपयाच्या वसुलीसाठी 5 ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवली होती. "1 ऑक्टोबर 2018 पर्यंत तुमच्या लोन अकाऊंटच्या सब अकाऊंटमध्ये एक रुपयाची थकबाजी आहे," असं यात म्हटलं होतं. बँकेने कुरिअरद्वारे पाठवलेल्या नोटीसमध्ये आरटीजीएस, एनईएफटी किंवा चेकद्वारे हा एक रुपया फेडण्यास सांगितलं. तसंच फेड न झाल्यास खातं ओव्हरड्यू राहिल, असंही म्हटलं होतं.
दर महिन्यात हफ्ता गेल्यानंतरही थकबाकी कशी राहिली? तसंच एक रुपयाची फेड कशी करायची असे प्रश्न कर्ज घेतलेल्या व्यक्तीला पडला आहे. ग्राहकाच्या मते, "जर बँकेप्रमाणे कुरिअर पाठवलं तर 85 रुपये लागतील. साध्या पोस्टाने पाठवले तरीही 5 रुपये खर्च होतात. स्पीड पोस्ट केलं तरीही 15 रुपये खर्च होतील. जर बँकेचे ऐकलं तर आरटीजीएस, एनईएफटीच्या माध्यमातून पेमेंट केलं तरीही 2.5 रुपये खर्च होतील."
कोणतंही खातं किंवा त्याच्या उप खात्यात थकबाकी ठेवायची नाही ही बँकेची अपरिहार्यता असते. जोपर्यंत पूर्ण रक्कम वसूल होत नाही, संबंधित खातं बँकेवर भार असतं. त्यामुळे 100 रुपयांपेक्षा कमी थकबाकी बँकेच्या अधिकार कक्षेत राहावी आणि बँकेने ती संपवून टाकावी, असे पर्याय सरकारने द्यायला हवे, असं रिझर्व्ह बँकेचे माजी संचालक विपीन मलिक यांनी सांगितलं.
एक रुपयाची वसुली, बँकेने 85 रुपये खर्च करुन नोटीस पाठवली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2018 01:57 PM (IST)
दर महिन्यात हफ्ता गेल्यानंतरही थकबाकी कशी राहिली? तसंच एक रुपयाची फेड कशी करायची असे प्रश्न कर्ज घेतलेल्या व्यक्तीला पडला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -