थिरुवनंतपुरम : केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आज (17ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता उघडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच सर्व वयोगटातील महिलांचा मंदिरात प्रेवश होईल. महिनाभराची यात्रा राजघराण्याच्या पूजेने सुरु होते, परंतु महिलांच्या प्रवेशास विरोध करणारे मुख्य पुजारी पुजेसाठी येण्याची नसल्याचं म्हटलं जात आहे.

भगवान अय्यप्पाच्या भाविकांनी काल (16 ऑक्टोबर) शबरीमला मंदिराकडे निघालेल्या 10 ते 50 वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांना रोखल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



अनेक संघटनांनी सामूहिक आत्मदहनाची आणि तोडफोडीची धमकी दिली आहे. या निर्णयाचा विरोध करणारे लोक मंदिराच्या दिशेने येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांची तपासणी करत आहेत. शबरीमला मंदिरापासून 20 किमी अंतरावर, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर महिलांना जबरदस्तीने रोखलं जात आहे.  तर विरोध करणाऱ्या काही महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सुप्रीम कोर्टाने महिलांना मंदिर प्रवेशाचे आदेश दिल्यानंतर, आज संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडलं जाणार आहे. त्यामुळे या मंदिरात महिलांना प्रवेश मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं आहे.