1965 चं भारत पाकिस्तान युद्ध अनेक कारणांसाठी लक्षात राहिलेलं. दुसऱ्या महायुद्धानंतर रणगाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर कुठे झाला असेल, तर तो 65 च्या भारत पाकिस्तान युद्धात. सतरा दिवस चाललेल्या या युद्धात शेकडो पॅटन उद्ध्वस्त करत भारतीय सेनेने पाकिस्तानची दाणादाण उडवली होती.
याच युद्धाच्या शेवटच्या दिवशी फ्लाईट लेफ्टनंट के सी करिअप्पा आपलं हंटर विमान घेऊन शत्रूवर तुटून पडले होते. इतक्यात पाकच्या तोफेने त्यांच्या विमानाचा वेध घेतला. विमान क्रॅश होण्याआधी करिअप्पांनी झटक्यात इजेक्टचं बटन दाबलं आणि ते सुखरुप बाहेर झेपावले, पण नेमके पाकिस्तानी सैन्याच्या घोळक्यावरच लँड झाले. पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतलं. ते युद्धकैदी बनले.
केसी करिअप्पांची दुसरी ओळख म्हणजे ते भारताचे पहिले फिल्ड मार्शल जनरल करिअप्पा यांचे पुत्र. स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, कमांडर इन चीफ म्हणून के एम करिअप्पा यांनी मोठा मान सन्मान कमावलेला. त्यांचं नाव देश विदेशात आदरानं घेतलं जायचं. त्यांचे पुत्र केसी करिअप्पा युद्धबंदी झाले आहेत, ही बातमी पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांना कळली.
फाळणीपूर्वी अयुब खान यांनी जनरल करिअप्पा यांच्या कमांडमध्ये काम केलं होतं. त्यांनी थेट जनरल करिअप्पांना फोन लावला आणि त्यांच्या मुलाला के सी करिअप्पांना 24 तासाच्या आत सोडतो अशी ऑफर दिली.
खरंतर आपला मुलगा शत्रूच्या कैदेत सापडलेल्या कुठल्याही बापाला हे ऐकून बरं वाटेल पण हा बाप देशाचा लष्करप्रमुख होता, कमांडर इन चीफ होता. त्यांनी नम्रपणे ही ऑफर नाकारली आणि देशासाठी लढणारे सगळे सैनिक माझ्या मुलासारखेच आहेत, असं बाणेदार उत्तर दिलं.
त्यानंतरचे चार महिने के सी करिअप्पा पाकिस्तानच्या कैदेत होते. तिथे सुरुवातीला त्यांना एकट्यालाच बंदी ठेवलं गेलं. बाहेरच्या जगाशी कसलाही संबंध नाही, कोणतीही बातमी कळत नव्हती, युद्ध सुरु आहे की संपलं हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता.
काही आठवडे असेच मानसिकता खच्ची करणारे गेले, अखेर त्यांना त्यांच्यासारख्याच 57 युद्धकैद्यांसोबत त्यांना ठेवण्यात आलं. चार महिन्याच्या बंदिवासात लष्करप्रमुख करिअप्पांचा मुलगा म्हणून केसींना कोणतीही विशेष सवलत मिळाली नाही हे विशेष.
या काळात जिनिव्हा करारानुसार पाकिस्तान आर्मीने वागणूक दिली असं के सी करिअप्पा सांगतात. त्यामुळेच युद्ध संपल्यावर आपल्याला परत मायदेशी पाठवलं जाईल अशी अंधूक आशा वाटत होती असंही ते सांगतात. अखेर या सर्व 58 युद्धकैद्यांना भारताकडे परत सोपवण्यात आलं.
विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर हे सारे प्रसंग करिअप्पांच्या डोळ्यासमोर तरळले. अभिनंदनच्या रक्ताळलेल्या चेहऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते त्याबद्दल नाराजीही व्यक्त करतात.
कोणत्याही सैनिकाला युद्धकैद्याच्या रुपात पाहणं हा त्याच्या कुटुंबासाठी कठीण प्रसंग. त्याकाळात सोशल मीडिया नव्हता यासाठी करिअप्पा देवाचे आभार मानतात.
विंग कमांडर अभिनंदन यांचे वडिल सुद्धा निवृत्त एअर मार्शल आहेत, या काळात हे वर्धमान पितापुत्र ज्या धीरोदात्तपणे वागले ते पाहून 65 च्या युद्धात करिअप्पा पितापुत्र जसे वागले त्याची आठवण येते आणि अशा वीरांबद्दल आदर वाढतो.