पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर तीन दिवसांच्या आत अभिनंदन यांचं भारतात प्रत्यावर्तन करण्यात आलं. त्यांना पाकिस्तानकडून भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला काहीशी दिरंगाई झाली. तरीही, भारताच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान प्रत्यावर्तन मानलं जात आहे.
मायदेशी परतल्याचा मोठा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांनी दिल्याची माहिती अमृतसरमधील अधिकाऱ्यांनी दिली.
वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परत आले. भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. अभिनंदन यांना मणक्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय हद्दीतील प्रवेशानंतरही त्यांच्या चाचण्या होणार आहेत.
VIDEO | तब्बल 60 तासांनी भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी | एबीपी माझा
'अभिनंदन'पर व्हिडिओचा पाकिस्तानचा अट्टाहास
दरम्यान, पाकिस्तानकडून अभिनंदन यांचा व्हिडिओ चित्रित केला जात असल्यामुळे त्यांना मायदेशी परतण्यास विलंब झाल्याची माहिती आहे. भारतात परतण्यापूर्वी पाकने त्यांना व्हिडिओ चित्रित करण्यासाठी दबाव टाकला. यामध्ये पाकिस्तानची स्तुती करण्यास अभिनंदन यांना सांगितल्याचं म्हटलं जातं.
अभिनंदन यांच्या मायदेशी पुनरागमनावेळी त्यांचे कुटुंबीयही वाघा बॉर्डरवर उपस्थित होते. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात आलं. तिथून ते वैद्यकीय चाचण्यांसाठी राजधानी दिल्लीला रवाना झाले.
भारतासह आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकत काल संध्याकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्धमान यांना पुन्हा भारताकडे सोपवण्यास संमती दर्शवली होती.
VIDEO | ...म्हणून हाफिज, मसूद आणि दाऊदची आता खैर नाही | स्पेशल रिपोर्ट
असे सापडले विंग कमांडर अभिनंदन पाकच्या ताब्यात
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा
अभिनंदन वर्धमान अपघातग्रस्त विमानातून पॅराशूटने बाहेर पडले. मात्र पाकव्याप्त काश्मिरमधील भिंबर जिल्ह्यातील एका गावात उतरले. त्यांनी ही कुठली जागा असल्याची विचारणा केली असता, एका नागरिकाने हा भारत असल्याची खोटी माहिती दिली.
स्थानिकांच्या वेशभूषेवरुन अभिनंदन यांना संशय आला आणि त्याने 'जय माता दी' अशी घोषणा दिली. मात्र त्याला जयघोषात उत्तर न आल्यामुळे आपण पाकिस्तानात असल्याची अभिनंदन यांची खात्री पटली. त्याक्षणी त्यांनी उपस्थितांच्या दिशेने पिस्तूल रोखली.
अभिनंदन यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. जखमी असल्यामुळे ते अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त पळू शकले नाहीत.
गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक
शत्रू पाकिस्तानींच्या घेरावात असतानाही अभिनंदन डगमगले नाहीत. संतप्त जमावाच्या हाती लागण्याआधीच त्यांनी स्वतःकडे असलेली महत्त्वाची कागदपत्रं आणि नकाशे खाऊन टाकले, तर काही पाण्यात भिजवले.
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याकडून गुपित उकळण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी आपलं नाव आणि बॅच नंबर याशिवाय कोणतीही माहिती दिली नाही.
''शांतीचा संदेश देताना आम्ही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका करु" अशी घोषणा इम्रान खान यांनी काल केल्यानंतर सभागृहात उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून प्रस्तावाचं स्वागत केलं होतं.