नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) आर्थिक फसवणूक करुन भारत सोडून पळून गेलेला आरोपी मेहुल चोक्सीसह नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी भारत सरकार खूप प्रयत्न करत असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. परंतु अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाने चोक्सीला भारतात पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चोक्सीला भारतात आणणे आता कठीण झाले आहे.


अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, "मेहुल चोक्सी आता अँटिग्वाचा नागिरक आहे आणि अँटिग्वा सरकार त्याची नागरिकता हिरावू शकत नाही. तसेच भारत सरकारचे कोणतेही अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नाही."

दरम्यान, काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी अँटिग्वाला जाणार होते. त्यानंतर या दोघांना भारतात आणण्यासाठी भारताकडून एअर इंडियाचे बोईंग विमान पाठवण्यात आले आहे.