नवी दिल्ली : 30 वर्ष जुन्या शताब्दी एक्स्प्रेसच्या जागी धावणाऱ्या 'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस' असे नाव देण्यात आले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल बोलताना रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, "या ट्रेनसाठी लोकांनी अनेक नावं सुचवली होती. परंतु आम्ही वंदे भारत एक्स्प्रेस या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसीदरम्यान 160 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावणार आहे."
पियुष गोयल म्हणाले की, "ही ट्रेन बनवण्यासाठी केवळ दीड वर्षांचा कालावधी लागला असून त्यासाठी 97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही रेल्वे वापरात आल्यानंतर 160 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावेल. चाचणीदरम्यान ही ट्रेन 180 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावली होती."
"ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये 16 कोच आहेत. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसीदरम्यान केवळ अलाहाबाद आणि कानपूर या दोनच स्थानकांवर थांबेल. ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन असून पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण आहे." असेही गोयल यांनी सांगितले
वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीहून सकाळी सहा वाजता सुटेल. दुपारी दोन वाजेपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल. 800 किमी अंतर केवळ 8 तासांमध्ये पूर्ण करेल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ही ट्रेन वाराणसीहून दिल्लीकडे रवाना होईल. रात्री 10.30 वाजता दिल्लीत दाखल होईल.
2 डिसेंबर रोजी या ट्रेन 18 ची कोटा ते सवाई माधोपूर सेक्शनदरम्यान चाचणी घेण्यात आली. यादरम्यान ही ट्रेन 180 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावली होती.