नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा काश्मीर दौरा समाप्त होण्याच्या दुसऱ्याच दिवशी आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती राजधानी दिल्लीत दाखल झाल्या. त्या उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीत काश्मीरमधील सध्यस्थितीवर चर्चा होणार आहे.


 

दरम्यान, काल मुख्यमंत्र मेहबूबा मुफ्ती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काश्मीरमधील जनतेला शांततेचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी सैन्य दलाला जबाबदार धरणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. काश्मीर खोऱ्यातीलच काही लोक शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

 

''काश्मीर खोऱ्यातील 95% जनतेला शांतता हावी आहे. मात्र, केवळ 5 टक्केच नागरिक येथे अशांतता पसरवत आहेत. दुर्दैवाने ते यासाठी आमच्या मुलांचा वापर करून सैन्यावर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये लहान मुले बळी पडावीत अशी यांची इच्छा आहे.'' असे त्या म्हणाल्या.

 

मेहबूबांच्या या दाव्यानंतर एका पत्रकाराने 2010 मधील या परिसरातील अशांतताचे मुद्दा मांडल्यानंतर त्या त्याच्यावर भडकल्या. ''तुम्ही या दोन्ही घटनांना एकत्रित करत आहात, त्यावेळी बनावट चकमकीत लोक मारले गेल्याचा अनेकांनी अंदाज बांधला होता. मात्र, आज ज्या चकमकी झाल्या आहेत, त्यात तीन दहशतवादी मारले गेले आहेत. त्याला सरकार जबाबदार कसे आहे? लोक रस्त्यावर उतरल्याने आम्हाला संचारबंदी लावावी लागली. ती मुलं आर्मीच्या कॅम्पमध्ये कोणती ट्रॉफी खरेदी करण्यासाठी गेले होते का? 15 वर्षांचा मुलगा जेव्हा दमाल हासिमपूरा पोलीस स्थानकावर हल्ला करतो, तेव्हा तो काय दूध आणायला गेला होता का?'' असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच देशवासीयांची इच्छा: राजनाथ