नवी दिल्ली : देशातील खासगी मेडिकल कॉलेजमधील जागा रिक्त राहू नयेत म्हणून नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने शेवटच्या क्षणी NEET-SS या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनचे कान उपटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देशातील वैद्यकीय शिक्षण हा एक व्यवसाय बनल्याचे  ताशेरे ओढले आहेत.  


नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने  NEET-SS या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये अगदी शेवटच्या क्षणी बदल केल्याने वर्षभरापासून या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांवर परिणाम होतोय, त्यांच्यासाठी हा बदल धक्कादायक असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. 


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या बेंचसमोर या विषयासंबधित एका याचिकेवर सुनावणी सुरु होती. केवळ खासगी मेडिकल कॉलेजमधील रिक्त राहणाऱ्या जागा भरायचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अगदी शेवटच्या क्षणी  NEET-SS  या परीक्षेत केलेला बदल हा आश्चर्यकारक असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. 


न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, देशातील वैद्यकीय शिक्षण हा एक प्रकारचा व्यवसाय बनला आहे असं दिसतंय आणि वैद्यकीय शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांची ही शोकांतिका आहे. 


या आधी NEET-SS परीक्षेसाठी असलेल्या पॅटर्नमध्ये 60 टक्के प्रश्न हे त्या-त्या विभागाशी संबंधित होते. त्यामुळे संबंधित विभागात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते सोपस्कर व्हायचं. नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने  NEET-SS परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आता नवीन बदल केला असून सर्व प्रश्न हे जनरल मेडिसिन वर विचारले जाणार आहेत.


महत्वाच्या बातम्या :