वॉशिग्टन : जगभरात फेसबुकच्या (Facebook) यूजर्सची संख्या अब्जावधीमध्ये आहे. रविवारी काही तासासाठी फेसबुक स्लोडाऊन झाल्यानंतर अनेकांचा जीव खाली वर होत होता. फेसबुक, इन्स्टाग्राम हे अनेकांच्या जीवनाचे, विशेषत: तरुणांसाठी अत्यावश्यक भाग बनले आहेत. पण फेसबुक हे लहान मुलांना बिघडवणारे, समाजात फूट पाडणारे आणि लोकशाही दुर्बल करणारे असल्याचा आरोप कंपनीची माजी कर्मचारी आणि व्हिसल ब्लोअर असलेल्या फ्रान्सिस हॉगन  (Frances Haugen) यांनी म्हटलं आहे. त्यांनी अमेरिकन कॉमर्स, सायन्स आणि ट्रान्सपोर्टेशन विभागाच्या सिनेट कमिटीसमोर ही साक्ष दिली. 


फेसबुकच्या माध्यमातून देशात सुरु असलेल्या या गोष्टी टाळायच्या असतील तर त्यावर लवकरात लवकर नियंत्रण आणावे अशी विनंती फ्रान्सिस हॉगन यांनी अमेरिकन सिनेटसमोर केली आहे.


फ्रान्सिस हॉगन अमेरिकन सिनेटसमोर बोलताना म्हणाल्या की, "मी बऱ्याच काळापासून फेसबुकचा वापर करतेय. मला वाटलं की आपल्यातील चांगल्या गोष्टी समाजासमोर आणण्याची फेसबुकमध्ये मोठी क्षमता आहे. पण आज मी तुमच्यासमोर आहे ते फेसबुकबद्दल वस्तुस्थिती मांडण्यासाठी. फेसबुकमुळे आपल्या मुलांवर वाईट परिणाम होतोय, समाजात फूट पडतेय आणि आपली लोकशाही दुबळी होत जातेय. या कंपन्यांच्या मालकांना फेसबुक आणि इंस्टाग्राम कशा प्रकारे सुरक्षित ठेवायचं हे चांगलंच माहिती आहे. पण समाजासाठी काही आवश्यक असणारे बदल ते करत नाहीत. कारण त्यांना केवळ आर्थिक फायदा मिळवायचा आहे. त्यामुळे लोकांच्या आणि समाजाच्या भल्यापेक्षा ते त्यांच्या आर्थिक फायद्याला अधिक महत्व देतात."


फ्रान्सिस हॉगन पुढे म्हणाल्या की, "काँग्रेसने आता एक ठाम भूमिका घेत यावर कारवाई करावी. कारण काँग्रेसच्या कारवाईशिवाय फेसबुक स्वत:मध्ये आवश्यक बदल करणार नाही. काल फेसबुक पाच तासाहून अधिक काळासाठी स्लोडाऊन झालं होतं. मला यामागचं नेमकं कारण काय माहिती नाही. पण या काळात समाजात फूट पाडणारे, लोकशाहीला धोक्यात आणणारे आणि तरुण मुली तसेच महिलांच्या शरीरावर कमेंट करुन त्यांना शरम आणणारे असामाजिक घटक निष्क्रिय झाले होते." 


 






संबंधित बातम्या :