नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला एक महिना होत आला, तरी पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवाद्यांवर कारवाई केलेली नाही, याविषयी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संताप व्यक्त केला आहे. 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी उचलूनही पाकिस्तानने हात वर करणं दुर्दैवी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले.

मसूद अजहर पाकिस्तानातच असून त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताची दोन विमानं पाडल्याचा पाकिस्तानने केलेला दावा खोटा असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं.

अभिनंदन यांनी पाकिस्तानचं विमान पाडलं होतं. भारताकडे पाकचं एफ 16 विमान पाडल्याचे पुरावे आहेत. पाकिस्तानने त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करावेत, असं आव्हानही रवीश कुमार यांनी दिलं.

जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. 14 फेब्रुवारीला घडलेल्या हा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला पुरावे दिले. इतकंच काय खुद्द 'जैश-ए-मोहम्मद' या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र पाकने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राईक केला होता.

'संयुक्त राष्ट्रांनी पुलवामा हल्ल्यामागे 'जैश-ए-मोहम्मद'चा सहभाग असल्याचं सांगूनही पाकिस्तान नाकारत आहे. जर पाकिस्तान नवीन विचारांचा नवा पाकिस्तान असल्याचा दावा करत असेल, तर त्यांनी दहशतवाद्यांविरोधात नवीन कारवाई करावी' असंही रवीश कुमार म्हणाले. दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानने सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.