नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ निश्चित झाला आहे. यावेळीही मोदी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी मोदींनी उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि होम ग्राऊंड गुजरातमधील बडोदा अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. बडोद्याची जागा मोदींनी पाच लाख 70 हजार 128 मतांच्या फरकाने जिंकली होती, तर वाराणसीतून तीन लाख 71 हजार 784 च्या मताधिक्याने मोदींनी 'आप'च्या अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला अरुण जेटली, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, वैंकय्या नायडू, शिवराज सिंग चौहान यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते. मोदींच्या उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे.
उमेदवारी देताना भाजप वयाचा निकष लावणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र उमेदवाराच्या विजयाची खात्री हा एकमेव निकष भाजप लावणार आहे.
17 व्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा आहे. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला निवडणुकांचं कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात सात ते आठ टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता 'पीटीआय'ने वर्तवली आहे.