मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर कोरोनाची लस घ्यावी, कोरोनाची स्थिती पूर्ण नियंत्रणात यावी यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. अनेकजण रुमालाचा वापर मास्क म्हणून करतात. याला आता चाप बसणार असून रुमालाला मास्क समजण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मास्कच्या ठिकाणी रुमालाचा वापर केल्यास 500 रुपये दंड लावण्याची घोषणा करण्यात येणार आहे.
500 रुपयांपासून 50 हजारांपर्यंत दंड
लसीकरण न केलेल्या प्रवाशांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. तर खाजगी वाहक कंपनी मालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच
सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारचे आवाहन
1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल).
2. जेथे जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा.
3. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
4. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
5. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.
6. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.
7. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तॉड व नाक झाका आणि वापरलेले पेपर नष्ट करा: जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिंकावे.
8. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
9. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा.
10. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.
11. कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.
संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ
1. लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती.
2. ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती.
3. 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती.
संबंधित बातम्या :
- Corona Vaccination : लसीकरण न झालेल्या प्रवाशांना 500 रुपये तर दुकानदार, खासगी वाहतूकदारांना 10 हजारांचा दंड लागणार
- ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय
- एका व्यक्तीच्या फोटोमागे लसीकरणाचे अपयश दीर्घ काळ लपवता येणार नाही; राहुल गांधींचा मोदींना टोला