CDS Bipin Rawat Funeral : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. दिग्गज नेतेमंडळींनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सेनादल प्रमुखही यावेळी उपस्थित होते. जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम देण्यात आला आहे. यावेळी लष्कराने 17 तोफांची सलामी दिली आहे.


 ब्रार स्क्वॉयर येथे 800 सैनिक तैनात असणार आहेत. या 800 सैनिकांमध्ये वायूसेना, नौदल आणि लष्कराचा समावेश  आहे. तर तीनही सेना दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर ,  800 सैनिकांकडूनही मानवंदना वाहिली.  या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते. 


लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्य दलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 


सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागची नेमकी कारणं काय असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण कुन्नूरमध्ये ज्या टेकडीवर हेलिकॉप्टर कोसळलं होतं, त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुर्घटनेसंदर्भातील तांत्रिक माहिती या ब्लॅक बॉक्समुळं समजू शकते. 


कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत



  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.

  •  बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती

  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले.

  •  रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.