Happy Daughters Day 2020: दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी डॉटर्स डे म्हणजे मुलींचा दिवस साजरा केला जातो. आज 27 सप्टेंबर रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातोय. या दिवशी परिवार आणि समाजात मुलींचा सन्मान केला जातो. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. मात्र खरंतर असा एका दिवसासाठी सन्मान करायचा का? तर बिलकुल नाही. प्रत्येक दिवस हा मुलीच्या सन्मानाचा असायला हवा. मात्र भारतासारख्या देशात काही काळापूर्वी मुलींना दुय्यम वागणूक दिली जायची, तिचा जन्म नाकारला जायचा. आजही काही ठिकाणी अशा घटना आपल्याला ऐकायला मिळतात. त्यावेळी मुली देखील कुठंच कमी नाहीत, हे सांगण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे.


आज डॉटर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर Happy Daughters Day 2020 ची धूम सुरु आहे. मुलीसाठी तसंतर आयुष्यातला प्रत्येक दिवस स्पेशल असतो. मुलगी असणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. भारतात अजूनही काही लोकं मुलींना दुय्यम लेखत असतील मात्र मुली आज कुठंही कमी नाहीत. मुलगी म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आज मोठ्या प्रमाणात बदलली आहे. मात्र काही ठिकाणी असे प्रकार आजही सुरुच आहे. यासाठी या दिवसाचं महत्व आहे.


जे लोकं आजही मुलीला कमी लेखतात त्यांना मुली कमजोर नसतात याची जाणीव करुन देण्याचा हा दिवस आहे. मुलगी ते प्रत्येक काम करु शकते जे काम मुलगा करतो. मुलगी शिकेल तर निश्चितच प्रगती करेल. आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो की मुलांनी आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं, मात्र तिथं अनेक अशी उदाहरणं पाहायला मिळतात जिथं मुलगी आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा सांभाळ करते.


आजही जगात अनेक देशांच्या प्रमुखपदी महिला विराजमान आहेत. अनेक महत्वाच्या संस्थांचं प्रतिनिधित्व मुली करत आहेत. भारतात देखील अनेक राज्यांचा कारभार महिलांच्या हाती आहे. देशातील महत्वाची पदं महिला भूषवत आहेत. महत्वाच्या प्रशासनिक पदांवर महिला अत्यंत चांगलं कर्तव्य बजावत आहेत.


त्यामुळं आजही आपण जर मुलींना दुय्यम वागणूक देत असाल, तिला कमजोर लेखत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या मुलीला तिच्या पायावर उभं राहण्याची संधी द्या. तिच्या पंखांना बळ द्या. ती आपल्यासाठी स्पेशल आहे याची जाणीव तिला करुन द्या.