Manipur Viral Video: मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी (Manipur Violence) मणिपूर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, या फोनचा वापर घटनेचा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस तपासात जप्त करण्यात आलेला मोबाईल फोन हा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.


आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी


मणिपूर पोलिसांनी रविवारी (23 जुलै) रात्री ट्विट केलं आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.


सायबर सेलकडे पाठवण्यात आला फोन


हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, मणिपूर अत्याचाराच्या प्रकरणात एक फोन जप्त करण्यात आला असून तो सायबर सेलकडे पाठवण्यात आला आहे. आम्हाला खात्री आहे की हा तोच फोन आहे ज्यावरून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता, असंही पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.


मणिपूर प्रकरणाचा अधिक तपास सुरू


या घटनेत सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींची चौकशी केली जात आहे. 4 मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली होती. या घटनेचा व्हिडिओ दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर 19 जुलै रोजी व्हायरल झाला, ज्यामुळे देशभरात संताप पसरला आणि त्याविरोधात निदर्शनं झाली. यानंतर 20 जुलै रोजी पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली.


अधिकारी म्हणाले - अफवांमुळे हिंसाचार वाढला


मणिपूरमध्ये 3 मे पासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या विविध सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला.


अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 4 मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आलेल्या भयानक घटनेमागे अफवाच कारणीभूत होती, जी सोशल मीडियावर एका महिलेचे पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले मृत फोटो समोर आल्यानंतर घडली होती. हे फोटो समोर आल्यानंतर चुरचंदपूर येथील आदिवासींकडून पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करण्यात आला. या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे फोटो देशाच्या राजधानीत एका महिलेची हत्या झाल्याचे आहेत हे नंतर समजलं, पण तोपर्यंत चुरचंदपूर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता आणि दुसऱ्या दिवशी जे काही घडलं ते मानवतेला लाज वाटेल असं होतं.


हेही वाचा:


Manipur Violence : मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक; अन्य आरोपींचा शोध सुरू