Fish Production : भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक (Fish Production) देश आहे. जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा सुमारे 8 टक्के वाटा असल्याची माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Parshottam Rupala) यांनी दिली. भारतात मत्स्यव्यवसायनं 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना प्राथमिक स्तरावर उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता प्रदान केल्याचे रुपाला म्हणाले. 


मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागील 9 वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरीचा आढावा मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. मत्स्यव्यवसाय क्षेत्र उच्च परतावा देखील देत असल्याचे रुपाला म्हणाले. जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8 टक्के वाटा असलेला भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे. गेल्या नऊ वर्षात भारत सरकारनं मत्स्यपालन, मत्स्यसंवर्धन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि मत्स्यपालक आणि मत्स्य शेती करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवर्तनकारक उपक्रम हाती  घेतल्याचे  रुपाला यांनी सांगितले. 


मत्स्यपालन क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक


गेल्या नऊ वर्षांमध्ये भारत सरकारने मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन क्षेत्रात गुंतवणूक वाढवल्याचे रुपाला म्हणाले. 2015 पासून, केंद्र सरकारने 38,572 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये विक्रमी मत्स्य उत्पादन झालं आहे. भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन 95.79 लाख टन (2013-14 अखेर) वरुन 162.48 लाख टन (2021-22 च्या शेवटी) पर्यंत वाढले आहे. म्हणजेच सुमारे 66.69 लाख टनांची वाढ नोंदवली गेली. याशिवाय, वर्ष 2022-23 मध्ये राष्ट्रीय मत्स्य उत्पादन 2013-14 च्या तुलनेत 81 टक्के वाढ नोंदवत 174 लाख टनापर्यंत (तात्पुरते आकडे) पोहोचणे किंवा त्याहून अधिक होणे अपेक्षित आहे.


दुप्पट सागरी खाद्य निर्यात


2013-14 पासून भारतातील समुद्री खाद्य निर्यात दुप्पटीहून अधिक झाली आहे. 2013-14 मध्ये समुद्री खाद्याची निर्यात 30,213 कोटी रुपये होती. त्यामध्ये वाढ झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात जागतिक बाजारपेठ महामारीने लादलेल्या आव्हानांना तोंड देत असूनही ती 111.73 टक्क्यांनी वधारुन 63,969.14 कोटी रुपयांवर पोहोचली. आज, 129 देशांमध्ये भारतीय समुद्री खाद्य निर्यात केली जाते. भारताचा सर्वात मोठा आयातदार अमेरिका आहे. मच्छीमार आणि मत्स्यशेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे संस्थात्मक क्रेडिट: भारत सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षापासून सुरु केलेली किसान क्रेडिट कार्ड सुविधा मच्छिमार आणि मत्स्यशेतकऱ्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करत असल्याची माहिती रुपाला यांनी दिली. आत्तापर्यंत मच्छिमार आणि मत्स्यपालकांना 1,42,458 किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Co-operative Societies : मच्छीमारांना सक्षम करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यावर सरकारचा भर