नवी दिल्ली : मुलाच्या फ्रॅक्चर झालेल्या पायाला वेदनेपासून आराम मिळावा, यासाठी त्याला मसाज करुन देणं आईला चांगलंच महागात पडलं आहे. 23 वर्षांच्या लेकाला ऑईल मसाज देताना रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

सप्टेंबर 2016 मध्ये बॅडमिंटन खेळताना 23 वर्षांच्या तरुणाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर पायाच्या घोट्याला प्लास्टर करण्यात आलं. मात्र प्लास्टर काढल्यानंतरही पायाची सूज आणि वेदना कमी झाल्या नव्हत्या.

पायाच्या प्लास्टरिंगनंतर शिरांमधील रक्त गोठणं (Deep vein thrombosis) हा प्रकार सर्वसामान्यपणे होत नसला, तरी अशक्यप्राय नाही. हाडाची दुखापत झालेल्या एक लाख रुग्णांपैकी 70 जणांना हा त्रास संभवू शकतो. त्यामुळेच ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना आणि सूज यांचा इलाज करावा, असं वरिष्ठ डॉक्टर सांगतात.

आरोग्याच्या बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी मसाज दिला जातो. तरुणाच्या आईला होणाऱ्या भीषण प्रकाराची पुसटशीही कल्पना नसल्याने तिने केवळ मुलाची वेदना शमवण्यासाठी त्याला मसाज दिला. मात्र त्याचा परीणाम उलटाच झाला.

तरुणाच्या पोस्टमार्टम अहवालानुसार तरुणाच्या पायात निर्माण झालेला 5 बाय 1 सेमी व्यासाचा ब्लड क्लॉट मसाजमुळे हलला. तो फुफ्फुसाच्या धमनी (pulmonary artery) कडे गेल्यामुळे तरुणाचा मृत्यू ओढावला.

31 ऑक्टोबरला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास तरुणाला बेशुद्धावस्थेत एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. या प्रकाराची नोंद आता मेडिको-लीगल जर्नलमध्ये करण्यात आली आहे.

'मसाज करताना पायावर लावलेल्या दाबामुळे क्लॉट सरकून तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे नुकतीच दुखापत झालेल्या भागावर मसाज करु नये, हा इतरांसाठी कायमचा धडा ठरेल. हर्बल ऑईल किंवा अँटी-इन्फ्लेमेटरी क्रीम्स लावणं ठीक आहे, मात्र त्यावर दबाव टाळावा. रक्ताच्या गुठळ्या असल्यास, त्या आपोआप जातील' असं एम्समधील डॉक्टरांनी नमूद केलं.