लखनऊ : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयाच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातल्या फैजाबादमध्ये एका व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा नष्ट करण्याच्या दृष्टीने पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर एका व्यक्तीने या निर्णयामुळे आपल्या छातीत धडधडत असल्याची तक्रार फोनवरुन केली. मात्र दवाखान्यात येईपर्यंत वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती फैजाबादेतील डॉक्टर आनंद गुप्ता यांनी दिली आहे.

मोदींच्या घोषणेनंतर छातीत दुखत असल्याच्या, भीती वाटत असल्याच्या तक्रारी अनेक रुग्णांनी केल्याची माहिती काही डॉक्टरांनी दिली आहे. काळा पैसा असलेल्या व्यक्तींना या रोकडीचं काय करायचं, ही चिंता भेडसावत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं म्हटलं जात आहे.

चिंतेचं कारण नाही :

पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील.

रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.

कुठे जमा करता येतील या नोटा?

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.