Pakistan Spy Arrested : पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू शरणार्थीकडून पाकिस्तानसाठी हेरगिरी (Pakistan Spy) सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी (Rajasthan police) दिल्लीमधून या पाकिस्तानी गुप्तहेराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या पाकिस्तानी हेराला तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले होते. 


राजस्थान पोलिसांनी 46 वर्षीय भागचंद याला हेरगिरीच्या आरोपात अटक केली आहे. आरोपीला तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाली होती. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा हा दिल्लीत वास्तव्यास होता. उदरनिर्वाहसाठी तो टॅक्सी चालवत होता. आरोपी भागचंद हा पाकिस्तानच्या हॅण्डलरच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. दिल्लीतील अनेक संवेदनशील माहिती आरोपीकडून पाकिस्तानकडून पाठवण्यात येत असल्याचे तपासात समोर आले होते. गुप्तचर यंत्रणांनी 14 ऑगस्ट रोजी हेरगिरीच्या आरोपाखाली भीलवाडामधून नारायण लाल गाडरी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या मोबाइलमधून महत्त्वाची माहिती समोर आली. यामध्ये दिल्लीतील संजय कॉलनीत वास्तव्य करणारा भागचंददेखील हेरगिरीत सहभागी असल्याचे समोर आले. 


1998 मध्ये भारतात दाखल 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हॅण्डलरकडून भागचंदच्या खात्यात पैसे जमा केले जात होते. मागील तीन वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. ऑटो-टॅक्सी चालवताना आरोपी भागचंद दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणांचे फोट काढून पाकिस्तानमध्ये पाठवत होता. 


अटक करण्यात आलेला आरोपी भागचंद हा 1998 मध्ये कुटुंबासह भारतात आला होता. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने मजूरीचे काम सुरू केले होते. आरोपीला तीन वर्षांपूर्वी भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. राजस्थान पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.  


दरम्यान, मागील महिन्यात राजस्थानमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली होती.  यामध्ये हनुमानगड जिल्ह्यातून अब्दुत सत्तार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील नितीन यादव, चुरु जिल्ह्यातील  राम सिंह यांना अटक करण्यात आली होती. या तिघांनी गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असल्याचे समोर आले. या माहितीसाठी तिन्ही आरोपींना पाकिस्तानच्या हॅण्डलरकडून काही रक्कमही मिळाली होती. आरोपी सत्तार हा 2010 पासून पाकिस्तानमध्ये ये-जा करत असल्याचेही चौकशीत समोर आले. भारतीय लष्कराबाबत आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना दिली असल्याची कबुली आरोपी सत्तारने चौकशीदरम्यान दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: