चेन्नई : नोटाबंदीनंतर तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये 200 खाजगी कंपन्या आणि व्यक्तींनी 600 कोटी रुपयांची संपत्ती विविध बँक खात्यात जमा केली आहे. तर नामक्कल जिल्ह्यातील एका व्यक्तीने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत तब्बल 246 कोटी रुपये जमा केले.


‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. या व्यक्तीने एवढी संपत्ती जमा करताच आयकर विभागाची त्याच्यावर नजर होती. आयकर विभागाने या व्यक्तीचा शोध घेताच त्याने सुरुवातीला बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 45 टक्के रक्कम जमा करण्याची तयारी दर्शवली. तर उर्वरित 25 टक्के रक्कम बिनव्याजी स्वरुपात सरकारकडे जमा केली.

संबंधित व्यक्तीने जमा केलेली रक्कम जुन्या नोटांमध्ये होती. याशिवाय अनेकांनी आपली संपत्ती पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत अघोषित रक्कम जमा करता येणार आहे.

काय आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजना?

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने काळा पैसा असणाऱ्यांना संपत्ती जाहीर करण्याची आणखी एक संधी दिली आहे. ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती आहे, ते या योजनेअंतर्गत आपल्याकडील पैसा दंडासह जमा करु शकतात. केंद्र सरकार हा पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरणार आहे. 31 मार्चपर्यंत ही योजना चालू असेल.