गाझियाबादच्या एका पार्कमध्ये बसलेली तरुणी आणि तिच्या मित्राला पोलीसांनी धमकावलं आणि अँटी रोमियो पथकाच्या नावाने गैरवर्तन केलं. त्यानंतर दोघांनाही पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवलं, असा आरोप निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेताच महिलांच्या सुरक्षेसाठी अँटॉ रोमियो पथकाची स्थापना केली. मात्र याचा त्रास निर्दोष तरुण-तरुणींनाच होत असल्याचं दिसत आहे. कारण पोलिसांकडून रस्त्यावर उभं राहिलेल्या तरुणांनाही चौकशी करुन त्यांच्याशी गैरवर्तन केलं जात असल्याचा आरोप आहे.
तरुणींची छेड काढणाऱ्या किंवा रस्त्यावर, महाविद्यालये, शाळाबाहेर उभं राहून टवाळकी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करणं या पथकाचा मुख्य उद्देश आहे. योगी आदित्यनाथ यांनीही निर्दोष तरुण-तरुणी, प्रेमीयुगुल यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.