नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली असून तब्बल दीड कोटी लोकांनी आतापर्यंत भीम अॅप डाऊनलोड केलं आहे, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. शिवाय, भीम अॅपमुळे भारताची कॅशलेसकडे वाटचाल सुरु झाली असल्याचेही ते म्हणाले.
दुरदर्शनवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. पाच राज्यांमधील निवडणुका आणि त्यात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पहिल्यांदाच मोदी 'मन की बात'मधून बोलत होते.
"एक दिवस पेट्रोल-डिझेल वापरु नका"
यावेळी लोकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, तसेच इंधन बचतीसाठी एक दिवस डिझेल आणि पेट्रोल न वापरण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. शिवाय, अस्वच्छतेबद्दल मनात राग निर्माण व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
आंबेडकर जयंतीला 1 कोटी रुपयांचा मेगा ड्रॉ
भीम अॅपच्या माध्यमातून 50 रु ते 6 हजार रुपयांपर्यंतच्या प्रत्येक व्यवहाराचा लकी ड्रॉमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यातील पहिल्या विजेत्याला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय इतर अनेक रकमांची बक्षिसंही ठेवण्यात आलेली आहेत. ही सोडत 14 एप्रिलला पार पडणार आहे.