एक्स्प्लोर
घसा साफ करताना टूथब्रश गिळला, हकिमाचा सल्ला महागात पडला
एका हकिमाचा सल्ला दिल्लीतील एका युवकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. हकिमाच्या सल्ल्याने घसा स्वच्छ करण्याच्या नादात या तरुणाने चक्क टूथब्रशच गिळला. एम्सच्या डॉक्टरांनी अथक परिश्रम करून विना ऑपरेशन हा ब्रश बाहेर काढला.

नवी दिल्ली : 'नीम हकीम तो खतरे में जान' अशी एक म्हण हिंदीत प्रचलित आहे. अशाच एका हकिमाचा सल्ला दिल्लीतील एका युवकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. हकिमाच्या सल्ल्याने घसा स्वच्छ करण्याच्या नादात या तरुणाने चक्क टूथब्रशच गिळला. एम्सच्या डॉक्टरांनी अथक परिश्रम करून विना ऑपरेशन हा ब्रश बाहेर काढला. आबिद असे या 36 वर्षीय युवकाचे नाव असून तो दिल्लीतील सीमापुरी भागात राहतो. एम्समधील डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे टूथब्रश बाहेर काढला असून सध्या त्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. आबिद 8 डिसेंबर रोजी सकाळी ब्रश केल्यानंतर घसा साफ करत होता. यादरम्यान त्याने टूथब्रश गिळला. आबिदने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी अबिदला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्याला तातडीने जवळील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही अबिदने डॉक्टरांना नेमके काय झाले हे सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला पेन किलर देत पोटदुखीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आबिदवर औषधांचा परिणाम होत नव्हता, असे एम्सचे डॉ. प्रवीण अग्रवाल यांनी सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी छातीचा एक्स रे तसेच सीटी स्कॅन करुन पाहिले. पण यातून काहीच स्पष्ट होत नव्हते. पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये पोटात काही तरी अडकल्याचे उघड झाले. शेवटी डॉक्टरांनी आबिदला याबाबत विचारले असता त्याने ब्रश गिळल्याचे मान्य केले. जीटीबी रुग्णालयात एन्डोस्कोपी करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आबिदला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुन्हा एकदा सीटी स्कॅन करुन ब्रश पोटात नेमका कुठे अडकला आहे, याचा अंदाज घेतला. यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्याच्या पोटातून ब्रश बाहेर काढण्यात आले. या ब्रशची लांबी 12 सेंटीमीटर इतकी होती.
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले





















