नवी दिल्ली : दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर काश्मिरी तरुणाला बांधणारे मेजर लितुल गोगोई यांचा भारतीय सैन्यातर्फे सत्कार करण्यात आला. सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये, यासाठी 'निष्पाप' काश्मिरी तरुणाला गाडीवर बांधणाऱ्या मेजर गोगोईंवर टीकेची झोड उठली होती.


जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी नामी उपाय शोधला होता. जवानांच्या गाड्यांना 400 काश्मिरी तरुणांनी घेरलं होतं. या परिस्थितीत दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी एका काश्मिरी तरुणालाच जीपवर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

9 एप्रिलची ही घटना असून जमावातून बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असा युक्तिवाद व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर येत होता. मात्र खुद्द लष्कराकडूनच त्यांचा गौरव केल्याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांबद्दल मेजर लितुल गोगोई यांना लष्करप्रमुखांनी प्रशस्तिपत्रक देऊन गौरवल्याची माहिती आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या काश्मिर दौऱ्याच्या वेळी त्यांचा सत्कार झाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

मेजर गोगोई यांच्यावर राजकीय नेत्यांनी टीकेचा भडिमार केला होता. जम्मू काश्मीर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आर्मीनेही त्यांची न्यायालयीन चौकशी (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) केली होती.

अशा प्रकारे हिंस्र कृत्य करुन गोगोई यांनी मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं जात होतं. भारतीय सैन्याच्या नियमावली विरोधात हे कृत्य असल्याचं मानलं जात होतं.

एकही गोळी न चालवता आम्ही शेकडो जणांचे प्राण वाचवले, असं गोगोई यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. मी काहीच गैर केलेलं नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक होतो. मी घाबरलो नव्हतो. दगडफेक करणाऱ्यांनी सर्व बाजुंनी घेरलं, मात्र पोटनिवडणुका सुरळीत पार पडण्याकडे आमचं लक्ष होतं, असं लितुल गोगोई म्हणाले.

काय आहे प्रकरण?

9 एप्रिलला श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीची ड्युटी संपवून सीआरपीएफचे जवान निघाले होते. त्यावेळी काश्मिरच्या फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारलं.

विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते.

ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नव्हते. याचं कारण म्हणजे शत्रूच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.

बातमीचा व्हिडीओ -



संबंधित बातम्या :

VIDEO : दगडफेक रोखण्यासाठी जवानांनी काश्मिरी तरुणाला जीपवर बांधलं!

जवानांवर हात उचलणाऱ्या नराधमांची ओळख पटली

श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल


एका थप्पडच्या बदल्यात 100 जिहादींना ठार करा : गंभीर