दिसपूर : नियमित सरावासाठी गेलेलं हवाई दलाचं सुखोई-30 हे विमान बेपत्ता झालं आहे. चीनच्या सीमारेषेवर हे विमान बेपत्ता झाले असून विमानाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे.

आसामच्या तेजपूरमधून नियमित सरावासाठी या विमानाने उड्डाण केलं. तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

या विमानात दोन पायलट आहेत, अशी माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली आहे. विमानाचा अपघात झाला असावा, अशी शक्यताही हवाई दलाने वर्तवली आहे.

रशियातून खरेदी केलेलं सुखोई विमान हवाई दलाचं महत्त्वाच्या लढाऊ विमानांपैकी आहे. एका अहवालानुसार, मागील सात वर्षात 7 सुखोई विमानांचा अपघात झाला आहे.

या विमानाच्या निर्मितीला सुमारे 358 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांच्या श्रेणीत सुखोईचा समावेश आहे.

सुखोई विमानाचं वैशिष्ट्ये
दोन-इंजिन असलेलं सुखोई-30 विमानाची निर्मिती रशियन कंपनी सुखोई एव्हिएशन कॉर्पोरेशनने केली आहे. भारताच्या संरक्षणविषयक गरजांसाठी सुखोई विमान अतिशय महत्त्वाचं आहे. हे विमान सर्वप्रकारच्या हवामानात उड्डाण घेऊ शकतं. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्यास हे विमान सक्षम आहे.