Mahua Moitra Attack On Modi Government : लोकसभेतील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांचं एक ट्वीट व्हायरल झालं आहे ज्यात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहे. भाजपच्या हेकलर टीमनं तयार राहावं. सोबतच गौमूत्राचे काही डोसही घेऊन या, असंही महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे. हे ट्वीट त्यांनी काल 3 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास केलं.
यानंतर दुपारी लोकसभेत बोलताना महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, या सरकारला इतिहास बदलायचा आहे, वर्तमानावर विश्वास नाही आणि भविष्याची भीती आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोललेल्या गोष्टी केवळ बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी असल्याचं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर महापुरुषांचा उल्लेख केवळ नावापुरताच केला गेला. त्यांच्या विचारांचे पालन मात्र होत नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यांनी म्हटलं की, सरकारने सर्व धर्मांबाबत तटस्थ वृत्ती बाळगली पाहिजे असे नेताजींनी म्हटले होते आणि ते असते तर त्यांनी यापूर्वी हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिमांविरुद्ध कथित वक्तृत्वाला परवानगी दिली असती का? असा सवाल देखील खासदार मोईत्रा यांनी केला आहे.
हे सरकार घाबरले आहे, त्यामुळे विरोधकांना दडपण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवला जात आहे. नोकरशहांना भीती वाटते, म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा संवर्ग नियमांमध्ये बदल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, सरकारचा देशाच्या अन्नदातावर विश्वास नाही आणि त्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देत नाही. सरकारचा मतदारावर विश्वास नाही, त्यामुळे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटलं.